वर्धा - उमेदवारी अर्ज माघार घ्यायला लावण्याबरोबरच बंडखोरांना थंड करण्याचा मंगळवार अंतिम दिवस होता. हिंगणघाट मतदारसंघात आघाडीतील बंडखोरी रोखण्यात पक्षाला यश आले आहे. मात्र, हिंगणघाट आणि देवळी मतदारसंघातील महायुतीतील बंडखोरी रोखण्यास पक्षाला अपयश आले आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात आता तिहेरी लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. तेच आर्वी आणि वर्धा मतदारसंघात दुहेरी लढतीचा इतिहास कायम राहणार आहे.
जिल्ह्यातील देवळी मतदारसंघ राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. अनेक दिग्गज नेते याच मतदारसंघातून आल्याचा इतिहास आहे. यात, सलग ४ वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी राहिलेले काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रणजित कांबळे हे पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. भाजप काँग्रेस असा येथील लढतीचा इतिहास आहे. पण, यंदा जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला सुटला. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी बंडखोरी केली. ते माघार घेतील असे संकेत मिळाले होते. पण त्यांनी माघार न घेतल्याने तिहेरी लढत होईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - वर्ध्यात रावण दहनाला आदिवासी समुदायाचा विरोध
असेच चित्र हिंगणघाट मतदारसंघातही पाहायला मिळत आहे. ही जागा शिवसेनेला भेटावी, अशी मागणी होती. मात्र, भाजपचे विद्यमान आमदार असल्याने जागा भाजपकडे राहिली. यात शिवसेनेचे नेते शिंदे यांना देवळी मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याने नाराज होत त्यांनी बंडखोरी करत नामांकन दाखल केले. यातून माघार न घेतल्याने दोन्ही मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाल्याने लढत महत्वाची ठरणार आहे. यातच राष्ट्रवादीकडून माजी आमदार राजू तिमांडे हे रिंगणात असल्याने तिहेरी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे सुधीर कोठारी यांनी माघार घेतली असली तरी नेमका पाठिंबा कोणाला देणार याचा निर्णय ४-५ दिवसात घेणार असल्याचे सांगत असल्याने पाठिंबा कोणाला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.