वर्धा - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर एका बसमध्ये गावठी पिस्तुलासह 10 जिवंत काडतुस सापडले. येरला नाक्यावर निवडणूक स्थिर निगराणी पथकाने ही कारवाई केली.
आंध्र प्रदेशमधून येणारी आदिलाबाद - नागपूर बस येरला नाक्यावर तपासणीसाठी थांबवण्यात आली. तपासणी दरम्यान पथकाला मागील बाजूच्या सीटखाली प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली गावठी पिस्तुल आढळली. पिस्तुल मिळाले म्हणजे काडतुस असणार या आधारावर आणखी शोध घेतला असता 10 जिवंत काडतुस देखील मिळाले. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रवाशांना विचारणा केली. मात्र, सर्वांनी पिस्तुलाची जबाबदारी घेण्याचे टाळले. चौकशीनंतर एका संशयिताला ताब्यात घेतले.