वर्धा -कारंजा तालुक्यातील आगरगाव सावळी येथील ग्रामस्थांची वन्यप्राण्यांपासून संरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. सावळी गावातील एका युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
भुमेश गाखरे (वय 21) या युवकाचा काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यामुळे आगरगाव सावळी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजूबाजूच्या परिसरातही या वाघाची दहशत पसरली आहे.
हेही वाचा - भुसावळ्यात सामूहिक हत्याकांडानंतर तणावपूर्ण शांतता; घटनास्थळी जमावबंदी लागू
वाघाच्या भीतीने शेतीची कामे करण्यासाठी मजूर शेतकाकडे जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
सर्वेक्षण पथकातील कर्मचारीही वाघाच्या दहशतीत....
काटोल मार्गावरील बोरी फाट्यावर निवडणूक विभागाकडून स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहे. वाघाचा हल्ला झालेल्या परिसरपासून हा परिसर जवळच असल्याने सर्वेक्षण पथकतील कर्मचारी भीतीच्या सावटाखाली रात्र काढत आहे.