वर्धा -सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावे एक सर्व्हे व्हायरल झाला आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटर हेडचा वापर करण्यात आला आहे. या लेटरहेडवर विधानसभेसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांना असलेल्या जातीनिहाय पसंतीचा सर्व्हे आहे. संघाच्यावतीने याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकाराने भाजपमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सदर प्रकरण हे विद्यमान आमदार पंकज भोयर यांच्याविरोधात केलेला खोडकरपणा असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे.
व्हायरल झालेल्या या सर्व्हेमध्ये आमदार पंकज भोयर यांना तिसऱ्या क्रमांकाची पसंती दाखवली गेली आहे. पहिल्या क्रमांकावर माजी खासदार सुरेश वाघमारे आहेत. हा खोडकरपणा असून असा सर्व्हे संघ करत नसल्याचे वाघमारे म्हणाले. भाजपच्या मीडिया सेलच्यावतीनेही पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.