वर्धा -जुन्या पेन्शन योजनेची मागणी रास्त आहे. आपण उद्धव ठाकरे, अजित पवार आणि इतरांनाही विनंती केली होती की, महाराष्ट्रावर जो कर्जाचा डोंगर आहे, त्याची एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. त्यातून महाराष्ट्राची नेमकी काय परिस्थिती आहे, ते पुढे येईल. त्यातूनच पेन्शन योजना कशा पद्धतीने दिली जाऊ शकेल, याचा व्यापक अभ्यास झाला पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. वर्ध्यातील सावंगी (मेघे) येथे दत्ता मेघे सभागृहात मुख्याध्यापकांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी देशाच्या परिस्थितीसोबतच शैक्षणिक परिस्थितीविषयी भाष्य केले.
हेही वाचा... तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता ? शिवसेनेचा मोदींना सवाल
विरोधात भाषण करणारे सगळे काँग्रेसच्या शाळेत शिकून मोठे झाले
देशामध्ये आज ज्या वाईट गोष्टी झाल्यात, त्या आमच्या किंवा काँग्रेसमुळेच झाल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. पण, लोकसभेत जेव्हा उभे राहते, तेव्हा नेहमी एक गोष्ट म्हणते की, आमच्या विरोधात जेवढे भाषण करताना ते सगळे काँग्रेसच्या शाळेत शिकून मोठे झालेत. हे वास्तव या देशाचे आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलून विरोधकांना चिमटा काढला. तसेच आज कोणी कोणत्याही पक्षात असला तरी, त्याचा 'ओरिजनल डीएनए' काँग्रेसचाच असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. राजकारणात महाराष्ट्रात जो सर्वात जास्त संघर्ष अनुभवला तो माझ्या म्हणजेच पवार कुटुंबीयांनी अनुभवला आहे. या वयातही 52 वर्ष एकसारखे निवडून येणारे माझे वडील शरद पवार असल्याचा उल्लेख सुळे यांनी केला.