वर्धा -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजार बंद करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी नकार दिल्यास कारवाई होईल. यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होते. हे दूध पशूपालकांकडून दूध घेण्यास नकार देणाऱ्या मोठ्या दूध डेअरी आणि विक्री संघावर कारवाई करावी, असे आदेश पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. ते आज जिल्ह्याच्या कोरोना संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी शहरातील भाजीपाला विक्रेत्यांची व्यवस्थेची पाहणी करतांना माध्यमांशी बोलत होते.
"शेतकऱ्यांच्या भाजीसह दुध खरेदी न केल्यास डेअरी, बाजार समित्यांवर कारवाई करणार" राष्ट्रीय आपत्ती आणि साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत करणे ही शासन, प्रशासनाची जबाबदारी आहे. या कठीण परिस्थितीचा गैर फायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करणाऱ्यांचा इशारा केदार यांनी दिला. शिवाय बाजार समित्या, डेअरी, दूध विक्री संघ हे शेतकऱ्यांकडून भाजी आणि दुध यांच्यामुळे काही कारणास्तव टंचाई परिस्थिती निर्माण होत असेल तर अशा समित्या आणि संघावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाई कराव्यात अश्या सूचनाही केदार यांनी दिल्या आहेत.जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्याना शासनाने लॉकडाऊनमधून वगळले आहे. तसेच शेतीची कामे सुद्धा यातून वगळण्यात आली आहेत. पशुखाद्य दुकाने सुरू ठेवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. तसेच याची वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांनासुद्धा लॉक डाऊन मधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. शिवाय गरज पडत असल्यास सामाजिक संस्थांचा सहभाग घ्या, असेही पालकमंत्री यांनी सांगितले. जिल्ह्यात अन्नधान्यसाठा पुढील दोन महिने पुरेल एवढा असून, अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात उपलब्ध आहे. तेलाचे उत्पादन करणाऱ्या ऑइल मील मालकाशी चर्चा करण्यात येत आहे. साखर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून येते. त्यामुळे तेथील जिल्हाधिकारी यांच्याशीसुद्धा संपर्कात असल्याचे जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले. नर्सेस आणि डॉक्टरांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होते.