वर्धा -देशात लॉकडाऊनमुळे उद्योग आणि रोजगार थांबला आहे. या बिकट परिस्थितीतीमध्ये अनेक कामगारांना रोजगारासाठी बाहेर पडता येत नाही. त्यामुळे रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबियांच्या पालन-पोषणाची जबाबदारी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि क्रीडामंत्री सुनील केदार यांनी उचलली आहे. यासाठी त्यांनी एक बैठक घेतली. जिल्ह्यातील 14 हजार 644 कुटुंबातील 50 हजार लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एकही माणूस उपाशी झोपणार नाही, याची जवाबदारी स्वीकारत पालकमंत्र्यांनी रेशनकार्ड देऊन धान्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. यामध्ये वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट या तीन विभागाचा समावेश आहे. ज्यांचाकडे रेशनकार्ड नाही असे 11 हजार 875 कुटुंब आहे. पात्र असतानाही काही त्रुटीमुळे त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. अशा कुटुंबांना लवकरात लवकर रेशनकार्ड बनवून देण्यासाठी शासनाकडे पाठवण्याच्या सूचना पुरवठा अधिकाऱयांना दिल्या आहेत. यामुळे या कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. रेशनकार्ड धारकांना तीन महिने 5 किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. मात्र, 14 हजार 644 कुटुंबांकडे रेशनकार्ड नाही आणि सध्या त्यांना नव्याने रेशनकार्ड देता येणार नाही. त्यामुळे अशा लोकांची जबाबदारी पालकमंत्र्यांनी स्वत: उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
या कुटुंबांना अन्नधान्यासोबतच खाद्यतेल, साखर, हळद, तिखट, मीठ, अंघोळ आणि कपड्याचा साबण इत्यादी जीवनावश्यक साहित्याची किट देण्यात येणार आहे. याचे वाटप सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आहे. सर्व सामाजिक संस्था आणि प्रशासनाच्यावतीने हे किट तयार करण्यास मदत घेतली जाणार आहे.
या बैठकीला अमादर रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रदीप जगताप, नगर प्रशासन अधिकारी मोहन शहा आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
शिधापत्रिका आहे, मात्र धान्य मिळत नसणारी कुटुंब -
1) वर्धा- कुटुंब 4480 ( लोकसंख्या 19984)
2) देवळी -1450 ( 6525)
3) सेलू - 360 (1277)
4) आर्वी 1158 ( 2930 )
5) कारंजा 123(534)
6) आष्टी 753( 2537)
7) हिंगणघाट 3418 ( 13672)