वर्धा-कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. 'काँग्रेसवाले शेती हा फायद्याचा धंदा नाही म्हणतात. त्यांनी शेतीउत्पन्नावर टॅक्स द्यावा लागणार नाही असे कायदे केले. मात्र, शेतीत उत्पन्नच निघत नाहीतर ईनकम टॅक्स कुठून भरणार? असा सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केला आहे. शेती घाट्याचा धंदा असला तरी काँग्रेसच्या नेत्यांनी शेतीतून ईनकम दाखवू-दाखवून इनकमटॅक्स मात्र वाचवल्याची हुशारी केली. परंतु काँग्रेसने कधी शेतकऱ्यांचा विचार केला नसल्याची टीकाही मुनगंटीवार यांनी केली आहे.
खोटं बोल पण ठरवून बोल-
यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकरी धोरण शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे म्हणत काँग्रेस शेतकरी कायद्याला विरोध करत शेतकऱ्यांना भडकवण्याचा काम करत असल्याचा आरोप केला. 'सी' फॉर कोरोनाची संकट मिटून जाईल पण दोन 'सी' चे संकट अधिक महत्त्वाचे आहे. एक म्हणजे सी फॉर चायना, ज्याला भारताच्या प्रगतीची चिंता वाढली आहे. पण मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. दुसरा चिंता असणारा 'सी' म्हणजे काँग्रेस. त्यांनी खोटे बोल पण रेटून बोल या म्हणीला नवीन स्टाईलने आणले आहे, खोटं बोल पण ठरवून बोल, असा टोलाही मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला. काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांना असे सांगतात, की मोदी सरकारने केलेले कायदे जसे काही शेतकऱ्यांवरचे शेवटचे संकट आहे, असेही मत त्यांनी यावेळी बोलून दाखवले आहे.