वर्धा -आमच्या चार कार्यक्रमावर पाणी फेरले तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या जीवनात पाऊसरुपी आनंदाचे क्षण येऊ दे, अशी प्रार्थना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम चांद्यापासून बांधापर्यंत राबवताना जिथे जिथे वृक्ष लागवड केली तेथे पावसाची कृपा झाल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
मुनगंटीवार यांच्या हस्ते सेलू येथील नवीन बसस्थानकाच्या कामाचे भूमीपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सेलू हिंगणी ते हिंगणाच्या ३५० कोटी रुपयांच्या रस्त्याचेही भूमिपूजन करण्यात आले. कष्टकरी गरीब जनतेला बसस्थानकावर गेले असता साध्या सुविधाही मिळत नाहीत. विमानाने रोज १ लाख लोक प्रवास करतात. त्यांना इतक्या सुविधा दिल्या जातात. पण सामान्य कष्टकरी ६८ लाख लोक जे बसने प्रवास करतात त्याना सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे अर्थमंत्री होताच महाराष्ट्रातील बस्थानकाला निधी देण्याचे ठरवल्याचे मुनगंटीवार म्हणाले. ६५९ पैकी १७५ पेक्षा जास्त बस्थानाकाचे काम सुरू झाल्याचेही मुनगंटीवार झाले.
जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सेवाग्राम विकास आराखड्याचे काम हाती घेतले. यावेळी महात्मा गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवत काम करत राहिलो. यावेळी पंकज भोयर यांनी सेलू शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 30 कोटीच्या निधीची मागणी केली. त्यांच्या या मागणीला मुनगंटीवार यांनी मंजुरी दिल्याचे आश्वासन दिले.