वर्धा - कारंजा तालुक्यातील सावळी खुर्द फाट्यावर बस न थांबल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको केले. यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. नागपूर-अमरावती महामार्गावरील गावांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. यामुळे आज संतप्त विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले. आखेर बस गावात येण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मार्ग सोडला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कारंजा तालुक्यातील सावळी बद्रुक फाट्यावर विद्यार्थी कारंजा येथील शाळेत जाण्यासाठी पोहचले. जवळपास 100 विद्यार्थी एकार्जुन गावातून 4 ते 5 किमी पायपीट करत पहाटे फाट्यावर येतात. अनकेदा पहिली बस न थांबता पुढे गेल्यास विद्यार्थ्यांना जवळपास एक ते दोन तास शाळेत जाण्यास उशीर होतो. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.