वर्धा :वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कात्री गावातील महेश शंकरराव पाटील यांनी स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. वर्धा जिल्ह्यातील वातावरण तसे उष्णच असते. इथल्या वातावरणात एखाद्या गावात स्ट्रॉबेरी पिकेल, असे स्वप्नातही कुणाला वाटल नसेल. पण महेश पाटील यांनी पाऊण एकरात स्ट्रॉबेरी फुलवली आहे. प्रयोग म्हणून त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. आता स्ट्रॉबेरी शेतात पिकत आहे. स्ट्रॉबेरीचे उत्पादन म्हटले की महाबळेश्वरचे नाव पुढे येते. पण आधुनिक तंत्रज्ञान वापरत इतरही जिल्ह्यात शेतकरी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहे. वर्धा जिल्ह्याच्या कात्री येथील तरुण शेतकऱ्यान स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या स्ट्रॉबेरीतून चांगल उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
तीन वर्षांपूर्वी नोकरी :महेश पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी नोकरी सोडली. सुरुवातीपासून आवड असल्याने शेतीतच वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली. घरी वडिलोपार्जित अठरा एकर शेतीत कापूस, मिरची, चणा, सीताफळ आदी पीक घेतले. महाबळेश्वर येथे असताना त्यांनी स्ट्रॉबेरीची माहिती घेतली आणि शेतात लागवड करण्याचे ठरवले. नोव्हेंबरमध्ये त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्याकरीता मशागत केली. रोप महाबळेश्वर येथून आणले. स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी ते सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत आहेत. आता स्ट्रॉबेरीची फळे लागली असुन उत्पन्नास सुरूवात झाली आहे. प्रयोग यशस्वी ठरल्यास पुढे स्ट्रॉबेरी लागवडीचे नियोजन राहिल, असे पाटील सांगतात. त्यांना दोन लाख रुपये खर्चाचा अंदाज आहे. चार लाख रुपये उत्पादन होऊ शकेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाआहे.