वर्धा - मागील तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आता घरासमोरच कुटुंबीयांना सोबत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याच प्रमाणे वर्ध्यातील रामनगर येथील एसटीडेपोच्या लगतच्या वसाहतीमधल्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. दिवसभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनात त्यांच्या घरातील महिलांसह चिमुकल्या मुलांनीही आंदोलनात आपली उपस्थिती लावली. आम्हाला आमच्या हक्काचे वेतानाचे पैसे द्या, एवढीच मागणी या आंदोलनाचे निमित्त कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली. त्यांच्या या मागणीवेळी डोळ्यातून निघणाऱ्या अश्रुंनी त्यांची हलाखीची परिस्थिती व्यक्त होताना दिसून येत होती.
एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह आक्रोश दर दिवाळीला हा सण आनंद साजरा करायचा असतो. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना दर वर्षीच एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे कारण पुढे करत कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवले जाते. मागील तीन महिन्यांपासून सतत कोरोनाच्या काळात सुद्धा जीव धोक्यात घालून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली. मात्र, वेतन न मिळाल्यामुळे तोंडावर असलेली दिवाळी आर्थिक चणचणीच्या अंधारातच साजरी करण्याची वेळ या एसटी कर्मचाऱ्यांवर आली होती.
एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह आक्रोश
कोरोना काळातील आमच्या कर्तव्याच्या विचार करून वेतन द्या-
दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर आला असताना अजूनही वेतन मिळाले नाही. खिशात दिवाळी साजरी करायला पैसाच नसल्याचे दु:ख व्यक्त करताना आंदोलक कर्मचारी म्हणाले की, कोरोनाच्या काळात केलेले कर्तव्य पाहता अत्यावश्यक सेवा बजावल्याची जाण ठेवत तरी सरकारने कर्मचाऱ्यांना पगार देणे अपेक्षित होते. तसेच या कोरोनामुळे तब्बल 80 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर वेतन न मिळाल्यामुळे दोन जणांनी आत्महत्या सुद्धा केली आहे. कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ का येत असेल याचाही सरकारने विचार करावा, अशी खंत या आंदोलक कर्मचाऱ्यांनी यावेळी ईटीव्ही भारतकडे व्यक्त केली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या घरात आनंद निर्माण व्हावा, त्याचा विचार करून तर सरकारने कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन द्यावे, अशी आशा त्यांच्याकडून आणि कुटुंबीयाकडून व्यक्त केली जात आहे.
या आंदोलनात पंकज येसनकर, अभिष पडोळे, अनिल माटे, संतोष निंबाळकर, दिनेश भोयर, संजय काळे, गौतम कांबळे, शरद काकडे, निलेश उघडे, प्रीतम कोल्हे, निखिल नागरीकर आदी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.