वर्धा : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिवसेंदिवस ऑक्सिजनची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेता ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी उत्तम गलवा येथील आयनॉक्स ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून जिल्ह्यासाठी किती ऑक्सिजन मिळू शकेल याचा आढावा घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या चमूने उत्तम गलवा येथील ऑक्सिजन प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आहे.
पथकाने प्रकल्पाची पाहणी करत आढावा घेतला जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पाहणी
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ संजय जायस्वाल, उत्तम गलवाचे अध्यक्ष बिरेंद्रजी, मुख्य कार्यकारी अधिकारी बिजॉय कुमार, मानव संसाधन सहाय्यक महाव्यवस्थापक प्रशांत जावदंड यांच्यासह प्रकल्पाची पाहणी करत आढावा घेतला.
उत्तम गलवाचा ऑक्सिजन प्रकल्प तांत्रिक बाबींची चमूकडून पडताळणी जिल्ह्यात उत्तम गलवा स्टील प्रकल्पासाठी कंपनीने आयनॉक्स कंपनीचा 264 मेट्रिक टन क्षमतेचा प्राणवायू पुरवठा प्रकल्प उभारला आहे. जिल्ह्यात भविष्यातील रुग्णांना लागणाऱ्या प्राणवायूची गरज बघता उत्तम गलवा यांच्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून वैद्यकीय गरजेसाठी ऑक्सिजन वेगळा करता येऊ शकतो का? याची चाचपणी या चमूने केली. औद्योगिक प्रकल्पासाठी निर्मिती होणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पातून वैद्यकीय गरजेसाठी लिक्विड प्राणवायू निर्मिती करण्यासाठी कोणत्या तांत्रिक बाबी लागू शकतात? त्यावर उपाय योजना करण्यासाठी कोणत्या बाबीची गरज आहे? तसेच निर्मितीनंतर ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बॉटलींग युनिट आदीं बाबींची पडताळणी चमूने केली आहे.
उत्तम गलवाचा ऑक्सिजन प्रकल्प प्रकल्पाचा इतर जिल्ह्यांनाही होईल फायदा
सध्या जिल्ह्यात सुमारे 15 हजार क्युबीक मीटर ऑक्सिजनची गरज आहे. भविष्यात 5 मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन गरज पडल्यास पर्यायी नियोजन केले जात आहे. उत्तम गलवा येथील प्रकल्पातून कोरोना रुग्णांसाठी प्राणवायू उपलब्ध झाल्यास वर्धा जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागून इतर जिल्ह्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो असे डॉ शिंदे यावेळी म्हणाले.