वर्धा - जिल्ह्यातील तळेगावमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या भव्य जनजागृती सायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग ६ नागपूर-अमरावती मार्गावरील तळेगाव पोलीस स्टेशन आणि स्थानिकांच्या वतीने हे स्वागत करण्यात आले. नागपूर ते मुंबई ही सायकल रॅली राज्य राखीव पोलीस दलाची माहिती देत जनजागृती करत जाणार आहे.
पोलीस विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले राज्य राखीव दलाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या यात्रेत सहभागी झाले आहेत. ठिक-ठिकाणी या राखीव दलाच्या सायकल रॅलीचे स्वागत होत आहे. या निमित्ताने तळेगाव येथून जात असताना त्यांचे स्वागत पोलीस स्टेशन तळेगाव तसेच मॉडेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देत केले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी राखीव दलाला पाचारण केले जाते. त्या ठिकाणी कुठलीही अनुचित घटना होऊ नये आणि शांतता टिकून राहावी यासाठी प्रयत्न करणे हे राखीव दलाचे कर्तव्य आहे. वेळेप्रसंगी केल्या जाणाऱ्या कामाची माहिती राखीव दलाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नागरिकांना दिली.