वर्धा -यावर्षी पावसाने सुरुवातीला दडी दिली आणि नंतर विलंबाने पाऊस पडला. पण जुलै महिन्याचा दुसरा आठवडा लागूनही दमदार पाऊस झाला नाही. यात कपाशीची लागवड घेतली. शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे मोर्चा वळवला. शेतकऱ्यांचे हक्काचे बोनस पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली जाते. पण, वर्धा जिल्ह्याच्या देवळी, समुद्रपूर तालुक्यात काही शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे ’अंकुर’लेच नसल्याने चिंता वाढली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
यात देवळी तालुक्यातल्या बाभूळगाव या गावातील 20 ते 25 शेतकऱ्यांनी अंकुर कंपनीचे प्रभाकर वाणचे सोयाबीन खरेदी केले. सर्वात महाग आणि चांगले बियाणे असल्याचे सांगून कृषी विभागाने दिलेले बियाणे 20 दिवस लोटूनही उगवले नाही. आता बियाणे जमिनीतच कुजले. यामुळे या हंगामात पीकाची आशा आता जमिनीत कुजली म्हणण्याची वेळ आली. जीवन बोबडे यांनी साडे सात हजाराचे बियाणे आणून 4 हजार लागवडीसाठी खर्च केला. पण केवळ 10 टक्केच बियाणे उगवल्याने नुकसान झाल्याचे जीवन बोबडे सांगतात. त्यामुळे हंगाम जाणार असल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
गावातील सचिन बिबडे यांनी 10 एकर कपाशीसोबत आंतरपीक म्हणून सोयाबीन लावले. 11 बॅग सोयाबीनसाठी 28 हजार रुपये लागले. लागवड खर्च मजुरी सगळं काही पाण्यात गेले. आता बियाणे कंपनीवाले येऊन म्हणतात तक्रार करू नका नवीन बियाणे देतो. पण पाऊस नसतांना आता दुसरे बियाणे पेरले तरी उगवणार नाही, असे ते सांगतात. यात मागील वर्षी दीडशे क्विंटल सोयाबीन झाले. यात हा हंगाम हातचा गेल्याने पूर्ण हंगामाची नुकसान भरपाई देण्याची मागणी बिबडे यांनी केली आहे.