वर्धा -समुद्रपूर तालुक्याच्या गिरड सहवन क्षेत्रातील खुर्सापार जंगलात विहिरीत अजगर पडल्याची माहिती एका व्यक्तीने दिली. यावरुन अजगराला बाहेर काढण्यासाठी सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. मात्र, ७ दिवसाच्या अथक परिश्रमानंतर अजगरला जीवनदान देण्यात आले.
विहिरीत पडलेल्या अजगराला सर्पमित्रांनी जीवदान दिले गिरड येथून खुर्सापार गावाला जाणाऱ्या मार्गावरील जंगलातील विहिरीत अजगर पडला होता. ही बाब वनरक्षक वाशिमकर यांना एकाने सांगितली. त्यांनतर या अजगराला काढण्यासाठी सर्पमित्र प्रकाश लोहट, महेंद्र बावने आणि निलेश मसराम यांनी प्रयत्न केले. मात्र, हा अजगर पाण्यात आतमध्ये जाऊन बसत असल्याने ६ दिवस प्रयत्न करुनही तो बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अखेर सातव्या दिवशी हा फासात अडकला.
सातव्या दिवशी तब्बल ३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या अजगराला बाहेर काढण्यात यश आले. हा अजगर ८ फूट लांबीचा असून त्याचे ९ किलो वजन आहे. गिरड येथील वन कार्यालयात या अजगराची नोंद करण्यात आली आहे. खुर्सापार जंगलातील नाग वनात अजगराला सुखरुप सोडण्यात आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी होती.
वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी ही विहीर बांधण्यात आली आहे
जंगलात वन्यप्राण्यांना पाण्याच्या व्यवस्थेसाठी १९९३ मध्ये विहीर बांधण्यात आली होती. ही विहीर १० फूट रुंद आणि साधारण ४० फूट खोल आहे. उन्हाळ्यात काळात विहिरीतील पाण्याचा वन्यप्राण्यांना आधार मिळतो.
अजगर हा पाणी प्रिय असतो. त्यामुळे थंड वातावरण पाणी असल्यास तो सहज जगू शकतो. साधारण वर्षभर सुद्धा तो शिकार नसल्यास राहू शकतो. पण गर्मी त्याला सहन होत नाही, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक पराग दांडगे यांनी ईटीव्ही भारतला दिली