वर्धा - पालक डोळे बंद करून शिक्षकांवर विश्वास ठेवत आपल्या पोटच्या गोळ्यांना शाळेत पाठवतात. पण वर्धा जिल्ह्यात एका शिक्षकाने या विश्वासाला तडा दिल्याने, मुलांना शाळेत कोणाच्या विश्वासावर पाठवायचे ? असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत. सिंदी (रेल्वे) पोलीस स्टेशन अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. सतीश बजाईत असे या शिक्षकाचे नाव आहे.
कोणाच्या विश्वासावर मुलांना शाळेत पाठवायचे? शिक्षकाचा विद्यार्थीनिंवर अत्याचार
आई-वडिलांनंतर आदराचे स्थान शिक्षकालाच दिले जाते. समाज घडवण्याची भूमिका बजावताना उद्याचे उज्ज्वल भविष्यही शिक्षक घडवतो. पवित्र क्षेत्र असलेल्या शिक्षण क्षेत्राचा कणा शिक्षक. मात्र, हा कणा असणाऱ्या शिक्षकानेच पेशाला काळिमा फासत एका मुलीवर अत्याचार तर एका मुलीचा लैंगिक छळ केला आहे.
मागील तीन महिन्यापासून हा घृणास्पद प्रकार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना ही बाब समजताच, त्यांनी पोलिसांत तक्रार केली. सिंदी रेल्वे पोलिसांनी या नराधम शिक्षकावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा...लहान भावाचा सांभाळ की शिक्षण ? रेश्माने निवडला 'हा' पर्याय
सतीश बजाईत हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असुन तो एका शिक्षक संघटनेचा नेताही असल्याची माहिती पुढे येत आहे. त्याने शाळेतील दोन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला. यात पीडित मुली तिसऱ्या आणि पाचव्या वर्गात शिकत असल्याचे सांगितले जात आहे. शिक्षणासारख्या पवित्र कार्याला बदनाम करणाऱ्यास पोलिसांनी बेड्या घातल्या आहे.
समाजाला दिशा देत उद्याची पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते शिक्षक अशा पद्धतीने वागत असेल तर काय म्हणावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशा विकृतांमुळे समाजाची दुर्दशा होईल, पण अशा प्रकारांमुळे इतर चांगले काम करणाऱ्यांना नाहक त्रास होण्याची शक्यता निर्माण होते, असे नागरिकांनी म्हटले आहे.