वर्धा- वैष्णव जण तो तेने काहिये जे, पीड पराई जाणे रे... हे बापूंच आवडतं भजन.
खरा वैष्णव तोच जो दुसऱ्याची पीडा, दुःख समजतो. त्यामुळे बापूंनी हा संदेश देत सेवाग्रामच्या पावन भूमितून देशालाच नव्हे तर जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला. इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडणाऱ्या 'भारत छोडो'च्या नाऱ्याची पायाभरणी याच भूमीत झाली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात सेवाग्राम आश्रम अग्रस्थानी होते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी या जागेला शतशः नमन...
स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडींंचे ठिकाण 30 एप्रिल 1936 मध्ये बापूंनी 'गावाकडे चला' असा नारा देत सेवाग्रामला वास्तव्यास आले. बापूंनी सर्वाधिक म्हणजे तब्बल 10 ते 12 वर्षाचा काळ या आश्रमात घालवला. बापूंच्या वास्तव्यामुळे सेवाग्राम आश्रम हे जागतिक ओळख देणारे ठिकाण बनले. बापूंना भेटण्यासाठी अनेक दिग्गज त्यावेळी परदेशातून या ठिकाणी येत होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्राम आश्रमाला राष्ट्रीय राजधानीचे स्वरूप आले होते. सेवाग्राम आश्रम हे स्वातंत्र्य लढ्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी तसेच बैठकींचे साक्षीदार आहे. त्यामुळे या भूमीला आज अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.