वर्धा- मांडवा शिवारात टेकडीवर अवयव नसलेला बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी शुक्रवारी बिबट्याची हत्या करण्याऱ्या 7 जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर अवघ्या काही तासातच वन विभागाने वाघदरा गावातून आरोपींना अटक केली. यासह त्यांच्याजवळून 3 पंजे, शेपूट, मुंडके आणि ज्ञानेंद्रिय ताब्यात घेतले. यात 1 पंजा आणि हत्यारे याचा शोध वन विभाग घेत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करून १५ डिसेंबर पर्यंत वन कोठडीत ठेवून पुढील तपास करणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक तुषार डमढेरे यांनी घटनास्थळाची पाहणी करत संपूर्ण चौकशी केली. यानंतर बिबट्याचा मृतदेह सापडला त्या स्थळापासून साधारण एक किमी अंतरावर असलेल्या गोविंद केकापुरे यांच्या शेतात हा बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे वनविभागाच्या लक्षात आले. याच आधारावर तपासादरम्यान गोविंदसोबत असणाऱ्या 6 जणांची नावे पुढे आली. या सातही जणांना वनविभागाने शिताफीने अटक केली. या सातही जणांनी केलेल्या कृत्याची कबुली त्यांनी दिली असल्याचे सांगितले जात आहे.
प्रत्यक्षात हा बिबट्या गोविंद केकापुरे याच्या शेतता सापळा असलेल्या एका तारेच्या जाळ्यात अडकला. यात त्या बिबट्याच्या मृत्यू झाला. त्यांनतर यात प्रवीण बुरघटे, मंगल मानकर, महेश आमझरे, राहुल कासार, रमेश कासार, नरेंद्र कासार अशा 1 जणांनी त्याची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. यात त्या बिबट्याचे चारही पंजे, मुंडके, शेपूट आणि जननेंद्रिय कापून टाकले. त्यांनतर त्याला शेतापासून 1 किमी अंतरावर असलेल्या मांडला शिवारात आणून फेकले, असल्याची सूत्रांची महिती पुढे आली आहे. मात्र, वन विभागाने याबाबत खुलासा केला नाही. यात अवयव कापल्याने शंका व्यक्त केली जात आहे. यात आणखी काही बाबी पुढे येतील का? वन विभाग त्या दिशेने तपास करत आहे.