वर्धा -महात्मा गांधींच्या विचाराधारेवर आधारित सर्वसेवा संघाच्या अध्यक्षपदाचा वाद पेटून आहे. यात सर्वसेवा संघाच्या अध्यक्षपदासठी होणाऱ्या दोन दिवसीय अधिवेशनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या 200 लोकांच्या परवानगीवर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर 50 लोकांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार आहे. 28 आणि 29 नोव्हेंबर, असे दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे.
महात्मा गांधीजींच्या विचारांना अनुसरून सर्वोदय सेवा मंडळाची म्हणजेच, सर्वसेवा संघाची स्थापना आचार्य विनोबा भावे यांनी केली होती. गांधींच्या विचाराचा प्रभाव असणारी शिखर संस्था म्हणजे सर्व सेवासंघ आहे. मागील काही काळापासून अध्यक्षपदाच्या वादामुळे गांधीवाद्यांसह संस्थेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निगडित अनेकांचे लक्ष त्याकडे वेधले आहे.
फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली 200 लोकांची परवानगी रद्द झाली होती. यामुळे आता फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे अधिवेशन 28 आणि 29 नोव्हेंबर, असे दोन दिवस चालणार असून, 29 तारखेला अधिवेशनात सर्वसेवा संघाच्या अध्यक्षाची निवड होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अध्यक्ष निवडीचा वादाला कशी झाली सुरवात?
सर्वसेवा संघाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड होणे अपेक्षित होते. पण, कोरोनामुळे हंगामी अध्यक्ष म्हणून मागील दोन सत्रापासून असणारे महादेव विद्रोही हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहिले. पण, त्यांच्यावर काही लोकांच्या आक्षेपानंतर ऑनलाइन बैठक घेत त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागेवर ऑनलाइन बैठकीतून चंदनपाल यांची नियुक्ती झाली. यानंतर महादेव विद्रोही यांचा एक गट आणि त्यांना विरोध करणारा दुसरा गट, असे दोन गट झाले. यात ही नियुक्ती चुकीचे असल्याचे म्हणत, प्रकरण हे चॅरिटी कमिशनर यांच्याकडे गेले.