वर्धा -नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रार्दुभावावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाकडून विविधी उपाययोजना राबवण्यात येत आहे. कोरोनाच्या या वाढत्या रुग्णसंख्येला लग्न समारंभातील गर्दीसुद्धा कारणीभूत ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्यात उपस्थितांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
गर्दी होणार नाही, याची खबरदारीसुद्धा आवश्यक -
सामूहिक कार्यक्रमात सहभागी होणार्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. आरटीपीसीआर चाचणी केल्याची खात्री केल्यानंतरच कार्यक्रमास परवानगी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत. तसेच लग्न समारंभात नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारीसुद्धा घ्यावी लागणार आहे.
लग्नसोहळा करणाऱ्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ -
लग्न सोहळ्यात उपस्थिताना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे आता लग्न सोहळ्यातील गर्दीला आळा बसण्याची शक्यता आहे. पण, लग्न सोहळ्याचे आयोजन करणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे कोरोनाचा प्रकोप असताना जे नियम शिथिल होते, ते नियम आता कठोर झाल्याने मात्र नाराजी व्यक्त होत आहे. कारण आता कमी पाहुण्यात लग्नसमारंभ साजरे करावे लागत असल्याने आनंद-उत्साहावरही निर्बंध लागले आहेत.
आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक -
सुरवातीला बँडपथकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक राहील, असे सांगण्यात आले होते. आता नव्या आदेशानुसार, धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, लग्नसमारंभ आदी कार्यक्रमांना उपस्थित राहणार्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्याचे नवीन सुधारित आदेश देण्यात आले आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणी झाल्याशिवाय परवानगी न देण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. यामुळे कार्यक्रमांचे नियोजन करणार्यांना मात्र आता चांगलीच कसरत करावी लागणार आहे. शिवाय बाहेर गावरून येणाऱ्या पाहुणे मंडळींना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा - मुंबईतील कराची बेकरी मनसेच्या विरोधानंतर बंद? वाचा संपूर्ण बातमी