वर्धा -वर्ध्यातील बहुचर्चित हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात ( Hinghanghat Case Result ) प्रतीक्षेत असलेला निकाल आज (9 फेब्रुवारीला) येणार आहे. 5 फेब्रुवारीला निकाल येणार होता. पण निकाल देण्यास न्यायालयाने असमर्थता दर्शवल्याने 9 फेब्रुवारीला निकाल निश्चित देणार, अशी माहिती सरकरी वकील यांनी दिली होती. आरोपी विकेशला फाशीची द्या, अशी मागणी केली जात असली तरी आरोपीला फाशी होणार की जन्मठेप हे न्यायाधीशांच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात 21 जानेवारी 2022 ला दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पुढच्या तारखेला निकाल देणार असल्याची माहिती न्यायमूर्तींनी सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली होती. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या पीडित प्राध्यापिकेला जाळण्याचा घटनेला 3 फेब्रुवारीला दोन वर्षे पूर्ण झाले आहे. यात दोन वर्षांपासून असणारी प्रतीक्षा आता संपणार आहे.
काय होती त्यादिवशीची घटना -
पीडित तरुणी ही हिंगणघाट येथील महाविद्यालयात कार्यरत होती. घटनेच्या दिवशी कॉलेजला जाताना आरोपी विकेशने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात गंभीर भाजल्या गेल्याने 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षण सत्यविर बंडीवार यांनी २८ फेब्रुवारीला आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले. पण जलदगती न्यायालयात प्रकरण चालणार असताना कोविडमुळे जवळपास 9 महिने कामकाजाला विलंब झाला. कोरोनाची पहिली लाट शांत होताच 14 डिसेंबर 2020 पासून सुनावणीला सूरुवात झाली.
77 पैकी 29 जणांची साक्ष महत्त्वाची -
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने पीडितेची बाजू मांडण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. प्रकरणाची पहिली सुनावणी 4 मार्च 2020 रोजी हिंगणघाट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. त्यानंतर न्यायालयाने जलदगतीने कमी वेळेत 64 सुनावण्या घेतल्या. या प्रकरणात पोलिसांकडे एकूण 77 साक्षीदार होते. ज्यामध्ये प्रत्यक्ष घटना पहाणारेही साक्षीदार होते. विशेष म्हणजे यातील एकही साक्षीदार फितूर न झाल्याने न्यायालयात पीडितेची बाजू सक्षमपणे मांडण्यात सरकारी वकील उज्वल निकम यांना यश आले.