वर्धा -जिल्ह्यातील अनेक भागात सतत झालेल्या पावसाने सोयाबीन आणि कापाशीच्या पिकांचे नुकसान झाले. मात्र, असे असले तरी ओला दुष्काळ अद्याप जाहीर झाला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह आमदार आणि स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी कारंजा तहसीलदार यांच्या दालनात पोहोचले. यावेळी संतप्त होत आमदार दादाराव केचे यांनी खडे बोल सुनावत कपाशीची खराब झालेली झाडे तहसीलदरांना दाखवली. शिवाय पंचनामे का केले नाहीत? असा सवालही केला.
यंदा सततच्या पावसाने कारंजा तालुक्यात जुलै ते सप्टेंबर या महिन्यात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. पावसाने उघडीप न दिल्याने पिके कुजली. परिणामी सोयाबीन नंतर आता कापशीची झाडेही सडत असल्याने झाडे घेऊन आमदार दादाराव केचे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे पदाधिकारी तहसीलदारांच्या दालनात पोहोचले. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असतानाही पंचनामा करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक कृषी सहायक हे बांधावर पोहोचले नसल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त आमदारांनी तहसीलदारांना खडे बोल सुनावले. जरा जरी शेतकऱ्यांची जान असती तर पंचनामे झाले असते. अतिवृष्टी होऊन सुद्धा पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती यांनी सवाल करत शेतकऱ्यांच्या नुकसानीची परिस्थिती मांडली.
यावेळी खरीपाचे पीक न आल्याने शेतकरी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवत आहेत. खरीप पिकांचे उत्पन्न घटले असून सुद्धा आणेवारी जास्त दाखवण्यात आली. तहसीलदार सचिन कुमावत यांना कपाशीचे झाड दाखवत विदारक परिस्थिती मांडण्यात आली. यामुळे हे पाहून तुम्हीच सांगा उत्पन्न होईल का असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी तहसीलदारांना विचारला. तत्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. दुर्लक्ष केल्यास आज दालनात आलो उद्या रस्त्यावर उतरू असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.