वर्धा- वन विभाग आणि पीपल फ़ॉर अॅनिमल्सच्यावतीने मुक्या प्राण्यांना हक्काचे घर अशी करुणाश्रमाची ओळख आहे. याच संस्थेच्या माध्यमातून अडचणीत असणाऱ्या मुक्या प्राण्यांसाठी काम केले जाते. अपघातात जखमी झालेल्या तसेच बचाव केलेल्या प्राण्यांना आधार दिला जातो. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्यावतीने त्यांच्यावर उपचार केले जातात. यात मागील तीन महिन्यांच्या कार्यकाळात करुणाश्रमात आलेल्या पाहुण्यांना निरोप देण्यात आला. यात खुला अधिवास दिसताच सर्वांनी धूम ठोकत जंगलात धाव घेतली.
अन्....'त्या' प्राण्यांनी पिंजरा सोडून जंगलात धाव घेतली - करुणाश्रम
वन विभाग आणि पीपल फ़ॉर अॅनिमल्सच्यावतीने मुक्या प्राण्यांना हक्काचे घर अशी करुणाश्रमाची ओळख आहे. याच संस्थेच्या माध्यमातून अडचणीत असणाऱ्या मुक्या प्राण्यांसाठी काम केले जाते. अपघातात जखमी झालेल्या तसेच बचाव केलेल्या प्राण्यांना आधार दिला जातो.
मागील 3 महिन्यात जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रातून वन्यप्राण्यांना उपचारार्थ वनविभागामार्फत करुणाश्रमात आणण्यात आले. त्यातून एकूण 15 वन्यप्राण्यांना योग्य उपचार देण्याचे काम डॉ संदीप जोगे यांनी केले आहे. जंगलात मुक्त केलेल्या प्राण्यांमध्ये 4 माकड, पोपट, कोकीळ, मोर आणि 8 अजगर अश्या प्राण्यांचा समावेश आहे.
विविध आपत्कालीन परिस्थिती सापडलेल्या प्राण्यांवर पीपल फॉर अॅनिमल्सचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संदीप जोगे यांनी गरजेनुसार प्राण्यांवर यशस्वी शस्त्रक्रियासुद्धा केली. यात प्रामुख्याने अजगर व माकड यांचा समावेश आहे. जखमी वन्यप्राण्यांवर उपचारासोबत देखरेखसुद्धा गरजेची असते. त्याकरिता पीपल फॉर अॅनिमल्सचे रोहित कंगाले, अभिषेक गुजर, व्यंकटेश जाकाते, सुमित जैन यांनी अथक प्रयत्न घेतले. योग्य औषधोपचार केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात प्राण्यांना सोडण्यात आले. याकरिता वर्धा आणि खरांगणा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, अभय ताल्हन यांचा मार्गदर्शनात क्षेत्र सहायक उमेश. डी शिरपूरकर, श्याम परटक्के, वनरक्षक कांबळे, मजरे, चौहान, तांबेकर उपस्थित होते.
मागील पंधरा वर्षपासून हे काम अविरतपणे सुरू आहे. आतापर्यंत केवळ एका वर्षात बऱ्याच वन्यप्राण्यांना जीवनदान देण्यात आले आहे. केंद्रिय चिडीयाघर प्राधिकरण व महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरण मान्यता प्राप्त वर्धा जिल्ह्यात वन्यप्राणी बचाव केंद्र आहे. या बचाव केंद्रात वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी उच्च विद्याविभुशीत पशुचिकीत्सा अधिकाऱयांसह मार्गदर्शक चमू उपलब्ध आहे.