वर्धा -हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेनंतर पीडितेच्या उपचराचा खर्च महाराष्ट्र सरकार करणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल होते. पण प्रत्यक्षात ही मदत ऑरेंजसिटी रुग्णालयात पोहचायला काही कालावधी लागला. तोपर्यंत कुटुंबीयांना स्वतःजवळून पीडितेच्या उपचारासाठी खर्च करावा लागला. मात्र, पीडितेच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच खर्चाचा धनादेश मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे डॉ कमलेश सोनपुरे यांनी हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना २४ फेब्रुवारीला पोलीस ठाण्याच्या सुपूर्द केला आहे.
हिंगणघात जळीतकांड पीडितेच्या उपचार सरकार करणार असे जाहीर झाले होते. पण, नागपुरातील ऑरेंजसिटी रुग्णालय प्रशासनाला निधी मिळायला विलंब झाला. यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार टीकासुद्धा केली, यामुळे राजकीय वाद सुद्धा निर्माण झाला होता. यावेळी पीडितेच्या उपचारासाठी कुटुंबीयांनी रुग्णालयात ६० हजार रुपये भरले होते. पीडितेच्या उपचारासाठी ३ ते १० फेब्रुवारीपर्यंत एकूण ५ लाख ४३ हजारांचा खर्च लागला. सुरुवातीला ४ लाख हे शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिले होते. पूर्ण बिल सादर केल्यानंतर उर्वरित १ लाख ४३ हजारांची रक्कमसुद्धा ऑरेंजसिटी रुग्णालयाला देण्यात आली. यासह कुटुंबीयांनी केलेला ६० हजार रुपयांचा खर्च धनादेशाद्वारे परत करण्यात आला.
ही रक्कम सोमवारी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी पीडितेच्या वडिलांना सोपवली आहे. या रकमेच्या धनादेश हिंगणघाट पोलीस ठाण्यात सोपवण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख डॉ कमलेश सोनपुरे, उपविभागीय अधिकारी डॉ. चंद्रभान खंडाईत, हिंगणघाट पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवीर बंडीवार आदी मान्यवर उपस्थित होते.