समुद्रपूर (वर्धा) :समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह उंदारांनी रात्रभर कुरतडला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कुटुंबियांनी संबंधित प्रकरणाची चौकशी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.
रेनकापूर येथील अडीच वर्षीय 'प्रथम' याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याला समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तिथे मृत घोषीत केले आणि त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. यानंतर मुलाला रुग्णालयात आणले तेव्हा तो मृत असल्याने, त्याचे शवविच्छेदन केल्याशिवाय मृत्यूचे कारण लिहून देता येणार नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी कुटुंबीयांना आमच्या चिमुकल्याचे शवविच्छेदन करू नका, अशी मागणी केली होती. परंतु, नंतर ते शवविच्छेदन करुन देण्यास तयार झाले. परंतु, रात्री उशीर झाल्याने प्रथमचा मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला होता.
आज (शनिवार) त्याचे कुटुंबीय जेव्हा ग्रामीण रुग्णालयात गेले तेव्हा मात्र त्यांना धक्का बसला. या शवविच्छेदन गृहात अडीच वर्षीय चिमुकल्याच्या मृतदेह उंदरांनी अक्षरशः कुरतडला असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून कुटुंबीय चांगलेच संतापाले. कुटुंबीयांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली. अडीच वर्षाच्या या लहान मुलाच्या मृतदेहाची झालेली विटंबना पाहून आरोग्य यंत्रणेत असलेल्या असुविधांचा लेखाजोखा देखील पुढे आला आहे.
हेही वाचा...संतापजनक..! इस्लामपूरमध्ये सात वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार