वर्धा - शहरातील रामनगर पोलिसांनी दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकी चोरी करण्यासाठी असलेल्या 'मास्टर की' सह अंदाजे 7 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोरोनामुळे अडचणीत असलेल्या दुचाकी धारकांना पोलिसांच्या करवाईने दिलासा मिळाला आहे. शेख नइम शेख युनूस, असे या चोरट्याचे नाव आहे. वर्धा शहर आणि रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत जानेवारी ते मार्च महिन्याच्या कालावधीत दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या.
चोरी गेलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक संशयीत चेहरा समोर आला. हा चेहरा होता, शेख नईम शेख युनूसचा जो वर्ध्याच्या स्टेशन फैलात राहत असल्याचे समोर आले. त्यावर सतत पाळत ठेवून त्याचा मागोवा घेण्यात आला. अखेर त्याबद्दल सबळ पुरावे हाती लागताच, त्याला अटक करण्यात आली. त्यांच्यावर इतरही मालमत्ता चोरीचे गुन्हे शहर ठाण्यात दाखल असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने 12 दुचाकी चोरल्याची कबुली पथकाला दिली. या दुचाकी चोरीत 11 गुन्हे दाखल आहे. यात 3 तीन दुचाकी चोरीचे गुन्हे शहर पोलीस ठाण्यात तर 8 दुचाकी चोरीचे गुन्हे रामनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.