वर्धा - वर्धा मतदारसंघाचा निकाल लागला असून भाजपचे रामदास तडस यांना मतदारांनी दुसऱ्यांदा कौल दिला आहे. विदर्भ केसरी राहिलेले रामदास तडस हे दुसऱ्यांदा निवडून येत राजकारणातील पैलवान असल्याचे त्यांनी सिद्ध केले. यंदा भाजपच्या विजयाने इतिहासातील दोन रेकॉर्ड मोडले आहेत. १ लाख ८७ हजार मताधिक्य मिळवत मिळालेला विजय हा मोदी लाटेचा आहेच पण सोबतीला इतरही महत्त्वाची कारणे आहेतच.
वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे विश्लेषण केले आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी. वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रामदास तडस तर काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्याच मुख्य लढत होती. तसेच राज्यात बहुतेक ठिकाणी तिहेरी लढत निर्माण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी यांच्यामुळेही निवडणुकीला रंगत आली होती. मात्र, आता वर्धेकरांनी रामदास तडस यांना निवडून दिले.
भाजपने यापूर्वी वर्ध्यामध्ये 3 वेळा विजय मिळवला आहे. तर सलग दोनदा निवडून येणारे भाजपचे पहिलेच उमेदवार आहेत. रामदास तडसांच्या पाठीशी अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भक्कम ताकद होती. तर पंतप्रधान मोदींनी देखील तडस यांच्यासाठी सभा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. तडस हे विदर्भ केसरी राहिलेले पैलवान आहेत.
जरी मोदींची लाट असली तर रामदास तडस यांची प्रतिमा मागील पाच वर्षातील चांगलीच सुधारली आहे. सहज उपलब्ध होणारा खासदार अशी ओळख त्यांना लोकांशी नाळ जोडून ठेवण्यात कामी आली. जातीय राजकारण तापले असताना त्यांना सर्वच समाजातून भरघोस मते मिळाली. त्यांनी केलेली विकास कामे आणि पाच वर्षात मतदारसंघातील गावा-गावात जाऊन पोहोचत तयार केलेला जनसंपर्क हे सुद्धा त्यांच्या यशाचे गमक आहे.
काँग्रेसचा गड भाजपमय होण्यास खऱ्या अर्थाने २०१४ पासून सुरुवात झाली. या पाच वर्षात भाजपकडे ग्रामपंचयात ते खासदार मोठी ताकद उभी राहिली. भाजपची ताकद वाढत असताना काँग्रेसला धक्के बसत राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा भक्कम पाठिंबा, भरघोस निधी त्यामुळे तडस यांना लोकांनी स्वीकारले, असे निवडणुकीच्या निकालावरून सध्या तरी दिसत आहे.
भाजपच्या यशाला मुकुट घालणारी सर्वात महत्त्वाची ताकद म्हणजे बूथ लेव्हलवर असलेली कुशल यंत्रणा. यावर भाजपने मागील दोन वर्षांत केलेले प्रचंड काम हे फलश्रुतीतून दिसले आहे. याचा फायदा मतदारांना घरातून काढत भाजपला मतदान करून घेण्यात जास्त परिणामकारक ठरले. त्यामुळे मताधिक्य हे १ लाख ८७ हजारांच्या घरात जाऊन पोहचू शकले. काँग्रेस येथे चांगलीच कमकुवत झाली आहे. भाजप सलग दोनदा निवडून येणारा ही इतिहासातील पहलीच वेळ. मागील 60 वर्षात भाजपकडून काँग्रेसने दोनदा पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
विधानसभेत काँग्रेसला लोकसभेच्या निकालाचा फटका बसणार आहे. अनेक वर्षांपासून खिळखिळी झालेली काँग्रेसने संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. काँग्रेसला जुन्या जाणकार लोकांनासुद्धा जवळ करत मार्गदर्शन घेणे आणि नवीन युवा शक्तीला सोबत घेत हाताची ताकद वाढवणे गरजेचे आहे. एकट्याने हात वर करून चालण्यापेक्षा जुन्या आणि नवीन याचे ताळमेळ बसवत हाताला जुन्या मार्गदर्शनाचा आधार जास्त महत्वाचा ठरेल. संघटना मजबूत झाला तर काँग्रेसला काही परिमाण पाडता येईल. अन्यथा एकला चलो रे ही भूमिका कायम राहिल्यास भाजपच्या वाढलेल्या ताकदी समोर काँग्रेस टिकणे सध्यातरी कठीण दिसत आहे.