वर्धा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद 17 ऑगस्टला सेवाग्रामला येत आहेत. ते प्रथमच सहकुटुंब सेवाग्राम आश्रमला भेट देणार आहेत. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानकडे त्यांनी चरखा चालवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सेवाग्राममध्ये त्यांचासाठी दोन अंबर चरखे महात्मा गांधींनी वास्तव्य केलेल्या निवासच्या ओसरीत ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रपती अंदाजे २० मिनिट सेवाग्राम आश्रममध्ये घालवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रपती कोविंद हे शनिवारी सहकुटुंब सेवाग्रामला येत असून सेवाग्राम आश्रमाला भेट देणार आहेत. कस्तुरबा हेल्थ सोसायटी, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला 50 वे वर्ष पूर्ण होत आहेत. हा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे.
राष्ट्रपतींच्या सेवाग्राम दौऱ्याचे वेळापत्रक -
सर्वप्रथम राष्ट्रपती कुटुंबासह सेवाग्राम आश्रमाला भेट देणार आहेत. यावेळी सेवग्राम आश्रम येथे त्यांचे स्वागत केले जाईल. यानंतर ते महात्मा गांधी सर्वात प्रथम सेवाग्राम आश्रमात आलेल्या आदिनिवास या कूटीला भेट देतील. आदि निवास येथे अंबर चरखा ठेवण्यात आला आहे. राष्ट्रपतींनी चरखा चालवण्याची इच्छा व्यक्त केल्याने तसे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे. यंदा महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी केली जात असल्याने या भेटीला विशेष महत्व आहे. त्यांनतर कस्तुरबा गांधी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'बा कुटी'ची ते पाहणी करतील. त्यानंतर मुख्य बापू कुटी येथील महात्मा गांधी यांचे बैठक स्थळ पाहतील. सोबतच काचेच्या पेटीत असलेल्या 17 ऐतिहासिक वस्तूचीही पाहणी करतील.