वर्धा - शहरातील अमृत योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. त्यामुळे आज (मंगळवार) प्रहारच्या वतीने वर्धा नगरपालिकेच्या कार्यालयात जिवंत व्यक्तीला तिरडीवर आणून नारेबाजी करण्यात आली. यामध्ये अमृत योजनेतील कामाचा निषेध करण्यात आला आहे. तसेच शहरातील खड्डे हे मृत्यूला आमंत्रण देत असल्याने 'मला मारायचे नाही' असे फलक घेऊन नगर परिषद कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले.
वर्धा शहरात रस्ते अपघाता अनेक घटना घडत आहेत. असे असतानाही नगर विकास प्रशासनाला जाग येत नसल्याने आज जिवंत व्यक्तीला तिरडीवर आणण्याची वेळ आली असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी म्हटले. यावेळी आंदोलकांकडून कामाचा आणि नगर परिषद प्रशासनाचा निषध नोंदवण्यात आला.
हेही वाचा -कोविड संकटात 'दाता' आणि 'डाटा' महत्वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अचानक 'तिरडी' घेऊन प्रहारने आंदोलन केल्याने नगर परिषदेत खळबळ उडाली. यावेळी नगर परिषद कार्यालयात मुख्यधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी वर्ध्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांना निकृष्ठ होत असलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली. शहरात अमृत योजनेत पाईपालाईन टाकण्यात आली. या पाईपलाईनसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. पण पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन सुद्धा ते खड्डे बुजवण्यात आले नाहीत. तसेच शहरातील अनेक भागात अजूनही कामे सुरू आहे. हे खड्डे कुठल्याही पद्धतीने बॅरिकेट्स न करता सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आली नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्डा लक्षात न आल्यास अपघात होऊन जीव जाण्याची शक्यता आहे, असे आंदोलकांनी म्हटले.