वर्धा- हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. हृदयविकाराचा झटका आल्याने पहाटे 24 वर्षीय पीडितेची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आज(सोमवार) सकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : पेट्रोल टाकल्यापासून ते पीडितेच्या अखेरच्या श्वासापर्यंतचा घटनाक्रम...
त्याने केलेलं कृत्य राक्षसी, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध - मंत्री यशोमती ठाकूर
अमरावती- ती निघून गेली आहे आणि माझ्यातील आई ही नि:शब्द झाली आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. तिच्या जाण्याने सर्वांना दुःख झाले आहे. जे कृत्य तिच्यासोबत झालं ते कृत्य राक्षसी होतं. या राक्षसी कृत्याला समाजात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. या पीडितेला आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
ज्यावेळेला त्या अपराध्याला कठोर शिक्षा मिळेल, तेव्हा तिच्या आत्म्याला शांती मिळेल. आता आम्ही लहान मुलांना मुलींना वेगळ्या प्रकारे प्रशिक्षण देऊ. तसेच या आरोपीला लवकरच शिक्षा व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मतही यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी कठोर कायदे करा - आमदार समीर कुणावार
वर्धा- ही घटना दुर्दैवी असून महाराष्ट्रात पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. तसेच शासनाने कठोर कायदे करण्याबाबत विचार करावा, अशी प्रतिक्रिया आमदार समीर कुणावार यांनी दिली. तसेच पीडित मुलीच्या तिच्या कुटुंबीयांना मदत करा व त्यांचे पुनर्वसन करा, अशी मागणी आमदार कुणावार यांनी केली आहे.
कायद्यातल्या सर्व बाबी तपासून प्रकरणाचा निकाल एक महिन्यात लागला पाहिजे - बावनकुळे
वर्धा - अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी कायद्याच्या सर्व बाबी तपासून या प्रकरणातील आरोपीला एक महिन्यात निकाल लागून शिक्षा झाली पाहिजे. तसेच पीडित कुटुंबाला सानुग्रह अनुदानासह शासकीय नोकरी मिळावी, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच अशा आरोपींचे वकीलपत्र न घेण्याची विनंती बावनकुळे यांनी वकील संघटनांना केली आहे.