वर्धा - न्यायालयात कौटुंबिक वाद असल्याने तारखेवर आलेल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये न्यायालय परिसरातच वाद झाला. हा वाद जास्त पेटला आणि परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. यावेळी ही बाब निदर्शनास येताच नागपूरवरून न्यायालयात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग पोटे हे हा वाद सोडवण्यासाठी गेले. यावेळी कुटुंबातील एकाच्या जवळ असलेल्या कटरचा कट लागून पोटे यांच्या पोटाला दुखापत झाली. ही घटना बुधवारी दुपारी न्यायालय परिसरात घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे.
वर्ध्यातील न्यायालय परिसर आणि प्रतिक्रिया शहरातील म्हाडा कॉलनी येथील मारोती माणिकराव मरघडे यांच्या कुटुंबातीलच दापत्यांचा वाद होता. याचीच तारीख असल्याने ते न्यायालयात आले होते. यावेळी न्यायालयाच्या रेकॉर्डरूम परिसरात त्यांचा कौटुंबिक वाद झाला. जोरजोरात आरडाओरडा सुरू असल्याने नागरिकांचे या घटनेकडे लक्ष गेले. यावेळी नागपूरच्या जरीपटका येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग पोटे हे वर्धा न्यायालयात एका प्रकरणात साक्ष पेशीवर आले होते. यावेळी त्यांना न्यायालय परिसरात हा सुरू असलेला गोंधळ दिसून आला.पोलीस म्हणून जबाबदारी समजत पराग पोटे भांडण सोडवण्यासाठी गेले. एवढ्यात माणिक मरघडे याच्या हातात असलेला छोटा कटरचा कट लागला आणि पोलीस निरीक्षक पोटे यांच्या पोटाला दुखापत झाली. यानंतर त्यांनी सदर व्यक्तीला पकडले. दरम्यान, पोलीस कर्मचारी मनोहर बोरघरे हे पोटेंच्या मदतीला धावले. यानंतर शहर पोलीस स्थानकात फोन करून अधीक पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस बोलावून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये मारोती माणिकराव मरघडे (वय 59), राखी मारोती मरघडे (वय, 29), मनोज मारोती मरघडे (वय, 33), नेहा मनोज मरघडे (वय, 30), सोहम अशोकराव ढेंगरे (वय, 24), सविता अशोकराव ढेंगरे (वय, 55) यांचा समावेश आहे. या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील तपास शहर पोलीस करत असून यातील आरोपी जवळील एक कटर जप्त करण्यात आले आहे. तसेच महिलेजवळ तिखटाची पुडी सुद्धा आढळून आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.