नाल्यातील सांडपाण्यापासून बनत होती गावठी दारू, पोलिसांनी सडवा केला नष्ट - वर्धा सांडपाण्यापासून दारूनिर्मिती
स्थानिक गुन्हे शाखेने वॉशआउट मोहीम राबवत हा अड्डा नष्ट केला. यात 37 ड्रममध्ये असलेले दारू सडवा रसायन 7 हजार 400 हजार लिटरसह दोन मोठ्या टाक्यांतील एकूण 9 हजार 400 लिटर दारू सडवा नष्ट केला.
वर्धा- शहराच्या मध्यभागातून बुरुड मोहल्ल्याच्या बाजूला वाहणाऱ्या नाल्याच्या सांडपाण्यापासून दारू निर्मिती केली जात होती. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीला लागून काठावर हा दारू निर्मितीचा कारखाना दिसून आला. यावेळी जमिनीत पुरलेले सडव्याचे ड्रम फोडून नष्ट करण्यात आले. मात्र हा जीवघेणा अड्डा नेमका कोणाचा होता हे कळले नाही.
स्थानिक गुन्हे शाखेने वॉशआउट मोहीम राबवत हा अड्डा नष्ट केला. यात 37 ड्रममध्ये असलेले दारू सडवा रसायन 7 हजार 400 हजार लिटर, यासह दोन मोठ्या टाक्यांत एकूण 9 हजार 400 लिटर दारू सडवा नष्ट केला. याची किंमत पाच लाखाच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. या नाल्यातील सांडपाण्यापासून ही दारू तयार केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
दारू कारखाना किती दिवसांपासून?
हा नाला शहराच्या मध्यभागातून वाहतो. मुख्य रोडवर पोलीस अधीक्षक कार्यालय असताना इतक्या मोठ्या प्रमाणात दारूनिर्मिती होत असताना ते शहर पोलिसांच्या नजरेस का पडले नाही हा प्रश्न आहे. हा जीवघेणा दारू निर्मितीचा कारखाना केव्हा पासून सुरू आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
गेल्या महिन्याभरात जवळपास दीड कोटीच्या घरात गावठी दारू निर्मितीचे मुद्देमाल नष्ट केले असल्याचे स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्रह्माने यांनी सांगितले. यामुळे गावठी दारूला अटकाव घालण्यास नक्कीच मदत मिळाली आहे.