वर्धा : वर्धा तालुक्याच्या पवनूर येथे सतत सुरु असलेल्या पावसामुळे वन विभागाचा वनराई बंधारा फुटला आहे. त्यामुळे नाल्याला पूर आल्याने पवनूर, खानापूर आणी कामठी या गावात पाणी शिरले.( water seeping into the village) सुरक्षेच्या अनुषंगाने नागरिकांना स्थानातरित करण्यात आले आहे. पवनूर येथील नागरिकांची तेथीलच असलेल्या मंदिरात व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच खासदार रामदास तडस, आमदार रणजित कांबळे यांनी जाऊन आढावा घेतला. यावेळी जीप सदस्य जयश्री गफाट भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.
सेलू तालुक्यातील सालई पेवठ येथे शेतशिवारातून पुराच्या प्रवाहात संतोष आडे हा इसम वाहून गेला होता. मंगळवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह सापडला आहे. तर पवनूर येथे आलेल्या पुरात 62 वर्षीय शालिक कृष्णाजी पाटील हा गुराखी रात्री वाहून गेला असून प्रशासनाकडून शोधमोहीम राबवली जात आहे. हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट पिंपळगाव रोड सुद्धा वाहतुकीकारिता बंद आहे. सोबतच हिंगणघाट येनोरा हा रस्ता सुद्धा बंद असल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे.जिल्ह्यात आणखी 48 तास अतिवृष्टीचा इशारा (Warning of heavy rain) देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव येथे सुद्धा रात्री नाल्याला पूर आल्याने गावात पाणी शिरले. यात गावातील अनेक घरामधील साहित्याची नासधूस झाली आहे. मांडगाव येथील सुद्धा इंदिरा वार्ड, कुंभारपुरा आणि पेठ वस्तीतील 50च्या वर घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. हळदगाव, शिवणी, मजरा, सेवा या चार गावांना जोडणारा पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्याने या गावांचा संपर्क रात्रीपासून तुटला आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे वणा नदीच्या पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील तांभारी या गावात सुद्धा पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. या गावातील शेतकऱ्यांची शेती अक्षरशः खरडून निघाली आहे. सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. आतापर्यंत आर्वी तालुक्यात 328.1 मिमी, कारंजा तालुक्यात 272.5 मिमी, आष्टी तालुक्यात 240.6 मिमी, वर्धा तालुक्यात 375.3 मिमी, सेलू तालुक्यात 350.1 मिमी, देवळी तालुक्यात 313.0 मिमी, हिंगणघाट तालुक्यात 388.7 मिमी तर समुद्रपूर तालुक्यात 489.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी आतापर्यंत 363.1 मिमी पाऊस पडला आहे.
हेही वाचा : Video गंगा नदीच्या महापुरात अडकले गजराज, पाठीवर होता महावत.. 'असे' वाचले प्राण, पाहा व्हिडिओ