वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील किन्हाळा येथे विहिरीत पडून वैष्णवीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शेतातील विहिरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेली असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. वडिलांनी मात्र जेव्हा विहिरीत पाहिले तेव्हा हादराच बसला. वैष्णवी डाखोरे असे मृतक तरुणीचे नाव आहे.
वैष्णवी शेतात जाताना घडली घटना : वैष्णवी ही इयत्ता 11 वीत शिक्षण घेत होती. वैष्णवी वडिलांच्या मागे शेताकडे निघाली होती, जाताना पिण्याचे पाणी नेण्याऐवजी शेतातील विहिरीतून पाणी भरून घेईल, असे तिला वाटले. पण, कोणाला ठावूक ती विहीर काळ बनून तिची वाट पाहत होती.
अशी घडली घटना : वैष्णवी शेतात विहिरीतून पाणी काढत असताना वैष्णवीचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. आवाज देण्याचा प्रयत्न केला असेलही पण कोणालाच आवाज ऐकू आला नसावा. काही वेळाने वडिलांना जेव्हा तहान लागली तेव्हा ते विहिरीकडे गेले.
वडिलांनी प्रथम पाहिले पण तोपर्यंत वेळ गेलेली : वैष्णवीचे वडील तहान लागल्यानंतर विहिरीकडे गेले तेव्हा काळजाचा तुकडा असलेली वैष्णवी बुडालेल्या अवस्थेत दिसून आली. यावेळी त्यांना जबरदस्त हादरा बसला. कशीबशी हिंमत करीत त्यांनी काहींना सांगितले, त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहचून वैष्णवीचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर घटनास्थळी समुद्रपूर पोलिसांनी पोहचून पंचनामा केला.
हेही वाचा : Nagpur News : गंमत म्हणून गळफास घेतल्याने 11 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू