वर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा शिवारात असलेल्या शेतात आईने आपल्या मुलासह कापसाच्या पेरणीसाठी गेली होती. ज्या पावसाची वाट पहात होते त्याच पावसाने घात केला. आकाशातून पडलेल्या विजेने आईचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. सुमती कारोटकर (वय ५५) असे मृत महिलेचे नाव तर निलेश (वय ३२) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
स्वतःच्याच शेतात वीज पडून महिलेचा मृत्यू देवळी शहराला लागून असलेल्या एकपाळा शिवार असलेल्या शेतात आई सुमती आणि मुलगा निलेश हे मजुरांकडे लक्ष देण्यासाठी शेतात गेले. पावसाचा अंदाज धरून पेरणी करणे याकडेच शेतकऱ्यांचे सारे लक्ष लागून असते. शेतात चार मजुरासह नीलेश आईसोबत शेतात कापसाची लावण करत होता. दुपारी दोघांनी जेवण केले. पुन्हा लागवडीच्या कामाला लागले. पण कोणास ठावुक नियतीच्या मनात काय असते.एवढ्यातच पाऊस सुरू झाला. दोघांनी शेतातली कडुलिंबाच्या झाडाचा आसरा घेतला. यावेळी वीजेचा कडकडाट सुरू झाला. एवढ्यात वीज अंगावर पडल्याने निलेशच्या आईचा मृत्यू झाला. तर निलेश हा गंभीर जखमी झाला. शेतातील मजुरांना कळताच त्यानी दोघांना उचलत शेतातून बाहेर आणले. आणि कुटुंबाला याची माहिती दिली. दोघांना सावंगी मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी महिलेला मृत घोषित केले. तर निलेश कारोटकर याच्यावर उपचार सुरु आहे. सुमती यांच्या मागे पती दोन मुले, मुली असा परिवार आहे. देवळी पोलिसांनी पंचनामा करत आकस्मित मृत्यूची नोंद केली.