वर्धा -हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा आज (सोमवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी मृत्यू झाला. तिचा मृतदेह दारोडा या तिच्या गावाला आल्यानंतर संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत राज्य राखीव पोलीस दलाचा एक जवान जखमी झाल्याने त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. रवी नेहारे (रा. नागपूर, एसआरपीएफ गट - 4) असे या जवानाचे नाव आहे.
संतप्त नागरिकांनी केलेल्या या दगडफेकीमध्ये त्याच्या छातीला आणि पाठीला मोठी इजा झाली. तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने प्रकृती बिघडली आहे. मागील एक तासांपासून त्याची प्रकृती खराब असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांना कळताच त्यांनी वाहन बोलावले. यानंतर या जवानाला हिंगणघाट येथे हलविण्यात आले.