वर्धा- वर्ध्याच्या पिपरी मेघेच्या लग्न सोहळ्याने प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज चार नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. हे चारही रुग्ण नवविवाहित नवरदेचाचे निकटवर्तीय आहेत. यात सकाळी पत्नी आणि आई तर दुपारी मामाचा मुलगा आणि मुलगी असे चार जण कोरोनाबाधित झाल्याचे पुढे आले.
दुपारी पॉझिटिव्ह रुग्ण शहराच्या मध्यभागातील गजबजलेल्या इतवारा परिसरातील असल्याने शहरासह 9 ग्रामपंचायतीत संचार बंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिलेत. वर्ध्यातील पिपरीच्या शिवराम वाडीत 30 जून रोजी लग्नसोहळा पार पडला. यात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या पाहुण्यातून चक्क नवरदेवलाच कोरोनाची बाधा झाली. नवविवाहित नवरदेव सात दिवसांनी पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच खळबळ माजली.
यामुळे जवळपास 35 ते 40 जण हायरिस्क मधील निकटवर्तीयांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. यात त्या नवविवाहित नवरदेवाची पत्नी आणि आई पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल सकाळी आला आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून तीन दिवस पिपरी मेघेत संचारबंदी लागू केली होती. आज दुपारी गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी इतवारा परिसरातील नवविवाहित नवरदेवाचा मामाचा मुलगा आणि मुलगी पॉझिटिव्ह आल्याने अजून खळबळ माजली. यात हा बाजार परिसर असल्याने सात दिवस बंद ठेवावा याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी एसडीओ सुरेश बगळे यांच्याशी चर्चा केली. पण परिस्थिती पाहता अखेर शहर आणि त्याला लागून असलेले 9 ग्रामपंच्यायतमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. ही संचारबंदी 10 जुलै रात्री 8 वाजल्यापासून 13 जुलै रात्री 12 पर्यंत लागू असणार आहे.