वर्धा - राज्यातील अनेक जिल्ह्यांत गंभीर कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमेडिसीवीरचा तुटवडा भासत आहे. असे असले तरी वर्ध्यात तुटवडा नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्हयात रेमडेसीवीर इंजेक्शन आणि आवश्यक औषधी उपलब्ध आहेत. तुटवडा असल्याच्या अफवावर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.
पूर्व विदर्भात वर्धा जिल्हयात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या परिस्थितीत असून रेमडेसीवीर इंजेक्शनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना आरोग्य विभागाच्यावतीने इंजेक्शन पुरविण्यात येत आहेत. वर्ध्यात प्रमुख रुग्णालयांमध्ये आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय आर्वी व हिंगणघाट येथे कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पर्याप्त प्रमाणात खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविड रुग्णांना बेड उपलब्धतेची माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या व्यवस्थापनाखाली नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
हेही वाचा-भाजप महाराष्ट्रासाठी देणार 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन
एकही रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही-यासाठी खबरदारी
नियंत्रण कक्षाच्या 07152 243446 दूरध्वनी क्रमांकावर कोव्हिड रुग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्यास कोणत्या रुग्णालयात किती बेड रिक्त आहे, याची माहिती दिली जाणार आहे. तसेच कोणत्या डॉक्टरांशी संपर्क साधावा याची महितीही दिली जाणार आहे. संबंधित डॉक्टरांचे नाव व त्यांचा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे. एकही रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेतली जात आहे.
हेही वाचा-रेमडेसीवीरच्या वाटपावर प्रशासनाची करडी नजर
डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑक्सीजन व व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था-
सेवाग्राम व सावंगी मेघे येथे वाढती रुग्णसंख्या पाहता अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. लवकरच कोविड रुग्णांच्या उपचाराकरीता जास्तीचे बेड उपलब्ध होणार आहेत. मात्र, आवश्यक रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑक्सीजन व व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी आग्रह करु नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.
24 तास कॉल सेंटरचा क्रमांक उपलब्ध-
नागरिकांनी कोव्हिड 19 आजारासंबधी रुग्णालयात दाखल होण्याकरीता बेड उपलब्धतेकरीता जिल्हा स्तरावरील esevawardha.in या संकेतस्थळाला भेट देऊन माहिती जाणून घ्यावी, असे जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी आवाहन केले आहे. बेड व्यवस्थापन कॉल सेंटरच्या या 07152 243446 या क्रमांकावर रुग्णांच्या नातेवाईकांना 24 तास संपर्क साधता येणार आहे.