वर्धा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. यातच अत्यावश्यक सुविधेत औषधं येत असल्याने त्याला सूट देण्यात आली. परंतु, नागरिक याच औषधी चिठ्या घेऊन विनाकारण फिरत असल्याचे पुढे येत आहे. यासोबत सर्दी, खोकला तापसारख्या आजारांकडे दुर्लक्ष करत औषधी घेतली जात आहे. यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चाप देण्यासाठी जुन्या चिठ्यांवर औषधी दिली जाऊ नये, असे आदेश आर्वी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी दिले आहेत.
लॉकडाऊन सुरू झाले आणि आता तिसऱ्या टप्प्यात पोहचले आहे. असे असतांना मोठ्या प्रमाणात नागरिक अद्याप रस्त्यावर केवळ जुन्या औषधींच्या चिठ्या घेऊन विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या नजरेस आले. यामुळे यावर निर्बंध घालण्यासाठी अशा चिठ्या आल्यास त्यांना औषध देऊ नये अशे आदेश देण्यात आले आहेत. सर्दी, खोकला, ताप, थोडी अंगदुखी अशा किरकोळ कारणांकरता दवाखान्यात जाण्यास टाळले जाते. मेडीकलमधून एखादी गोळी घेत त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न केला जातोय. यामध्ये कोरोनासदृश्य लक्षणाच्या व्यक्तींनासुध्दा औषधी दुकानामधुन विनातपासणी करुन औषधे दिली जात असल्याचे अधिकार्यांच्या निदर्शनास आले.