वर्धा- मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश घेत आहे. आज सचिन अहिर यांनी सेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवार साहेबांपुरतीच मर्यादित असल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच काँग्रेसची परिस्थितीही हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. वर्ध्यातील सेवाग्राम येथील चरखाघर येथे ते माध्यमांशी बोलत होते.
ते आज वर्ध्यात दौऱ्यावर होते. त्यांनी देशातील सर्वात मोठा असलेला गांधीजींचा चरखा तसेच सेवाग्राम विकास आराखड्यातून केलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणसुद्धा करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावर, जिल्ह्याधिकारी विवेक भिमानवार उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व कोणी करावे याचा एक मताने निर्णय होत नसल्याने हास्यास्पद आणि ज्या पक्षाला राष्ट्रीय नेतृत्व नसेल, त्या पक्षाची अशीच अवस्था होणार आहे. मोठ्या प्रमाणात गावपातळीवर असणारे बूथ लेव्हल तसेच सरपंच पदावरील कार्यकर्ते हे पंतप्रधान मोदीजींवर विश्वास ठेवत असल्याचेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.