वर्धा- वर्ध्यात आज साधेपणाने घटस्थापना करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत मंडळांच्या संख्येत मोजक्याच प्रमाणात घट झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ८२५ मंडळांमध्ये घटस्थापना झाली आहे. यात अनेक मंडळांनी मूर्ती स्थापना न करता केवळ फोटोसह घटस्थापना करून आदिशक्तीची पूजा अर्चा केली. तसेच, भक्तीमय वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात केली.
जिल्ह्यात दरवर्षी नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा होतो. रस्ते विद्युत रोषणाईने नाहून निघतात. जिकडे नजर जाईल तिकडे आकर्षक सजावट, भव्य दिव्य मंडप, असे चित्र पाहायला मिळते. पण, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने नवरात्री उत्सवाला सुरवात झाली. एक ठराविक अंतर सोडला की दुर्गा उत्सव मंडळांचे देखावे यंदा कोरोना जनजागृतीची महिती देणारे झाले आहे.
जिल्ह्यात यावर्षी ८२५ ठिकाणी घटस्थापना झाली आहे. यात मागील वर्षी ९११ मंडळांनी ढोल ताशांच्या गजरात नवरात्र उत्सवासाठी परवानगी घेतली होती. यंदा मात्र, ८६ मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. तेच काहींनी पूजा अर्चा करण्यासाठी केवळ घटस्थापणा केली. यात व्यापारी मित्र मंडळाची अनेक वर्षाची परंपरा असलेली कलकत्त्यावरून येणारी दुर्गा मूर्तीची स्थापना न करता घट मांडून पूजा करण्यात आली.