वर्धा -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी आज (मंगळवारी) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. वर्ध्यात 35 केंद्रावर मतदान होत असून यासाठी 23 हजार 68 मतदार आहेत. सकाळपासूनच पदवीधर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आले आहेत.
ईटीव्ही भारत प्रतिनिधी याबाबत आढावा घेताना. यंदा दुहेरी लढा -
पदवीधर मतदार संघामध्ये मागील अनेक वर्षांपासून भाजपचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, यंदाची निवडणूक चुरशीची आणि दुहेरी लढतीची असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून संदीप जोशी तर काँग्रेसकडून अभिजित वंजारी हे रिंगणात आहेत. यासोबत एकूण 19 उमेदवार रिंगणात आहेत. तरी दुहेरी लढत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे. वर्ध्याचे फेमस झालेले स्पर्धा परीक्षा शिक्षक नितेश कराळे हेसुद्धा यावेळी निवडणूक लढत आहेत. पहिल्यांदाच या निवडणुकीत युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे त्यांनी आपल्या प्रचारादरम्यान म्हटले आहे.
हेही वाचा -शिक्षक- पदविधरसाठी आज मतदान; महाविकास आघाडी विरोधात भाजपचा लागणार कस
नियमांचे पालन करून मतदान प्रक्रियेला सुरुवात -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर काळजी घेऊन मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी गोल करून लोकांना सामाजिक अंतर ठेवून उभे राहण्यास सांगितले जात आहे. मतदान केंद्राच्या आत जाण्यापूर्वीच हात सॅनिटाईझ करून, तापमान पाहून काळजी घेण्यासाठी सूचना केल्या जात आहे. त्यानंतर मतदारांना आतमध्ये सोडले जात आहे. तर कर्मचाऱ्यांनीही फेस शिल्ड घातले आहे.
ही निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची असणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना भाजपकडून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच काँग्रेसकडून पशुसंवर्धन मंत्री तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनी मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. दोन्ही पक्षांच्यावतीने पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचून मतदारांना प्रभावित करण्याचे करण्यात आले आहे. मात्र, मतदार कोणाला कौल देतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.