वर्धा - लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगार, मजूर, शेतमजूर, विद्यार्थी आणि इतर नागरिकांना स्वगृही पाठवले जात आहे. आतापर्यंत 3 हजार 286 नागरिकांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आले आहे. बुधवारी 325 प्रवाशांना उत्तर प्रदेशला जाण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर एसटी बसेस पाठविण्यात आले.
वर्धा जिल्ह्यातून 3 हजार 611 परप्रांतीयांना पाठवले स्वगृही कोरोनामुळे लॉकडाऊन झाले अन् अनेक परप्रांतीय कामगार, मजूर, विद्यार्थी, नागरिक जिल्ह्यात अडकून पडले. यामध्ये महाराष्ट्रातीलच नाही तर इतर राज्यातील, लगतच्या काही जिल्ह्यांसोबतच्या नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात अडकलेल्या अशा 8 हजार लोकांना वर्धेच्या निवारागृहात ठेवण्यात आले. त्यांची व्यवस्था सामाजिक संस्थांसोबतच संबंधित कंपन्यांनी केली. केंद्र व राज्य शासनाने कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यास परवानगी दिली. यासाठी रेल्वे विभागाने कामगारांसाठी श्रमिक रेल्वे सुरू केल्यात.
वर्धा जिल्ह्यातूनही एक श्रमिक रेल्वे सोडण्यात आली तर काहींना नागपूरपर्यंत बसने व पुढे श्रमिक रेल्वेने पाठविण्यात आले. त्यानंतर काहींना एसटी महामंडळाच्या बसने त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले. जिल्ह्यात विविध निवारागृहासोबतच इतर ठिकाणी राहत असलेल्या परप्रांतीयांची नोंद प्रशासनाकडे होत आहे. आतापर्यंत 4 हजार 993 नागरिकांची नोंद करण्यात आली. त्यापैकी 3 हजार 286 लोकांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात आले आहे. तसेच बुधवारी उत्तेरप्रदेशमधील 325 नागरिकांना एसटी बसने नागपूरपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. पुढे श्रमिक रेल्वेने त्यांना त्यांच्या राज्यात सोडण्यात येत आहे.
आजपर्यंत मध्यप्रदेशच्या 917 जणांना राज्य परिवहन महामंडळाच्या तसेच खाजगी बसने पाठविण्यात आले. यासाठी 42 बसेस वापरण्यात आल्यात. तसेच छत्तीसगढचे 659 लोकांना 40 बसने पाठविण्यात आले. बिहार 653, उत्तरप्रदेश 261, झारखंड 480, जम्मू-काश्मीर 46, हिमाचाल प्रदेश 4, पंजाब - 4, पश्चिम बंगाल 262 आणि बुधवारी 325 उत्तर प्रदेशमधील कामगारांना नागपूरपर्यंत बस आणि पुढे श्रमिक रेल्वेने त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले. यात वर्धा - 896, देवळी -589, सेलू -302, आर्वी - 624, आष्टी - 132, कारंजा - 108, हिंगणघाट - 441, समुद्रपूर - 194 नागिकांचा समावेश आहे.