महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदीजी, मुद्दे पे बोलिये; आमदार जितेंद्र आव्हाडांचा टोला

'या भाषणातून मोदींनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, मूळ मुद्यांना हात घालण्याची त्यांची आजिबात इच्छा नाही. त्यांनी आपल्या भाषणात बेरोजगारी, देशाची अर्थव्यवस्था, महागाई, दैनंदिन समस्या यांच्याबद्दल अवाक्षरही काढले नाही,' असे आव्हाड म्हणाले.

By

Published : Apr 1, 2019, 9:02 PM IST

जितेंद्र आव्हाड

वर्धा - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील आपल्या ३३ मिनिटांच्या भाषणात ११ मिनिटे देशातील मूळ मुद्यांना हात न घालता शरद पवार, पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका करण्यातच घालवली. या देशातील बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ आदी विषयांना त्यांनी स्पर्शही केला नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे देशभक्तीचे धडे देण्याचे काम केले. मोदींनी विरोधकांवर टीका करण्याऐवजी पंतप्रधान म्हणून देशासमोरील मुद्यांवर बोलावे,' असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

जितेंद्र आव्हाड


वर्धा येथे नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा झाली. या सभेत त्यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर टीका केली. त्यांच्या या टीकेचा आमदार आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. '१९४७ साली देश स्वातंत्र्य झाल्यानंतर महात्मा गांधी यांनी वर्धा येथेच राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दंगली वाढल्यामुळे ते दिल्लीला गेले. तेथे त्यांची अतिरेकी नथूराम गोडसे याने हत्या केली. ज्या वर्धा येथे महात्मा गांधी यांनी राहण्याचा निर्णय घेतला होता. त्या वर्धा येथेच महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात मोदी यांनी केली. सत्य, अहिंसा याच्यापासून कोसभर दूर असलेले मोदी अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्या वर्ध्यामध्ये प्रायश्चित घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ही अपेक्षा त्यांनी फोल ठरवली. ३३ मिनिटांच्या भाषणात त्यांनी ११ मिनिटे शरद पवार, पवार कुटुंबीय; राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका करण्यात घालवली. पण, आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना खड्यासारखे बाजूला सारले. त्याबद्दल अवाक्षरही काढले नाही. अवघा एक मिनिट त्यांनी महाराष्ट्राचा उल्लेख केला. शेती, गरीबी, दुष्काळ या विषयी केवळ दोन मिनिटांचे भाष्य केले. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी, कर्जबाजारी शेतकरी यांच्याबद्दल उपाययोजनांबद्दल अवाक्षरही काढले नाही. मात्र, हिंदूत्व, चौकीदार, घोषणाबाजी यामध्ये त्यांनी ९ मिनिटे वाया घालवली. पाच वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या काळातील कारकीर्द फक्त तीन मिनिटात आटोपली. या भाषणातून मोदींनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, मूळ मुद्यांना हात घालण्याची त्यांची आजिबात इच्छा नाही. त्यांनी आपल्या भाषणात बेरोजगारी, देशाची अर्थव्यवस्था, महागाई, दैनंदिन समस्या यांच्याबद्दल अवाक्षरही काढले नाही,' असे आव्हाड म्हणाले.


'पंतप्रधान नेहमीच आपल्या भाषणात ५ वर्षांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडत असतात. हा इतिहासच आज पंतप्रधान मोदींनी विदर्भामध्ये पुसून काढला आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या भाषणात आपली ध्येयधोरणे आणि देशाला काय दिशा देणार, हे सांगायचे असते. पण, मोदींनी त्यावर भाष्य केले नाही. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, वर्षाला दोन कोटी रोजगारनिर्मिती याबद्दल जनतेने विचारुच नये, यासाठी मोदींनी आपल्या बेगडी देशभक्तीचे धडे दिले. त्यांच्या भाषणाने जनतेचा अपेक्षाभंगच केला आहे,' असाही टोला आमदार आव्हाड यांनी लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details