वर्धा -आर्वी येथील मोबाईल चोराने चोरीचा मुद्देमाल ठेवण्यासाठी न्यायाधीशांच्या घराची निवड केल्याचे समोर आले आहे. आर्वी शहरातील मुख्य मार्गावर न्यायाधीशांची जुनी निवासस्थाने आहेत. त्याठिकाणी एका अल्पवयीन चोराने चोरीचा माल लपवून ठेवला होता. आर्वी पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आर्वीमध्ये एका चोराने न्यायाधिशांच्या बंगल्यात चोरीचा मुद्देमाल लपवला आर्वी शहरातील शिवाजी चौकात विशाल देशमुख यांच्या मालकीचे 'सिद्धेश मोबाईल शॉपी' हे दुकान आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्याने दुकानाचे पीओपी सिलिंग तोडून आत प्रवेश केला आणि 20 मोबाईल चोरून नेले. पोलिसांनी तपास करत संजयनगर परिसरातील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला.
विशेष म्हणजे, त्याने चोरीची मोबाईल ठेवण्यासाठी न्यायाधीशांच्या निवासस्थानाची निवड केली. जुन्या बंगल्यात शिरुन एका खड्ड्यात त्याने १७ फोन लपवून ठेवले तर तीन मोबाईल सोबत घेऊन गेला. त्याच्याकडून एकूण 1 लाख 43 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, पोलीस कर्मचारी विक्की म्हस्के, अतुल भोयर, चंदु वाढवे, ओमप्रकाश कोकोडे, अनिल वैद्य यांनी या प्रकरणाचा तपास केला.