वर्धा - लॉकडाऊन झाल्यापासून नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले. यात बाहेर राज्यातून आलेला मजूरवर्ग हा बेरोजगार झाला. यावेळी काही मजूर काही ठिकाणी थांबले तर काहींनी पायपीट करत घरी जाण्याच्या मार्ग निवडला. आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असताना वर्ध्याच्या रिंगरोडवर मजूर उपाशी चालत जाताना दिसले. यावेळी त्यांना खाण्या-पिण्याचे साहित्य देऊन एका वाहनाच्या मदतीने पुढील पायपीट थोडी का होईना कमी करून देण्यास हातभार लागला.
वर्धा रिंगरोडवर मजुरांचे जत्थे, गावी जाण्यासाठी भर उन्हात पायपीट - वर्धा न्यूज
देशात लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे अनेक ठिकाणी मजूर अडकून पडले आहेत. तिसऱ्या टप्प्याचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र, या मजुरांना जाण्यासाठी योग्य ती सोय करण्यात आली नाही, त्यामुळे त्यांनी चालतच घर गाठण्याचा निर्णय घेतला. असे मजुरांचे जत्थे आज वर्धा रिंगरोडवरून जाताना दिसले.
वर्धा रिंगरोडवर मजुरांचे जत्थे, गावी जाण्यासाठी भर उन्हात पायपीट
एकदा खायला मिळाले नाही तर चालेल पण, आम्हाला गावात पोहचायचे आहे. हेच ध्येय मनात ठेवून आम्हाला काहीच नको, आम्हाला आता आमच्या गावी जावू द्या. हे वाक्य जेव्हा घरी जाणाऱ्या आसुसलेल्या तोंडातून बाहेर पडते तेव्हा मात्र काळजाचा थरकाप उडतो. इतक्या कडक उन्हात डोक्यावर वाटेल ते बांधून हे मजूर गावी निघाले आहेत. घराची ओढ असल्याने ना त्यांना उन्हाची तमा आहे ना जेवणाची.