वर्धा- पर्यावरण तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी पिंपळकुळातील झाडाची गुटी कलम बांधण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले. हा कार्यक्रम वर्ध्याच्या निवेदिता निलयम केंद्रात पार पडला. हे प्रशिक्षण महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीने घेण्यात आले. या उपक्रमात वन विभागाचे कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमींनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पिंपळ कुळातील झाड लावावे, असे आवाहन मारुती चितमपल्ली यांनी केले.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील पर्यावरण क्लबच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रमात चितमपल्ली यांनी वडाच्या झाडावर कलम बांधण्याचे प्रात्याक्षिक करून दाखवले. कलम बांधणे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. यावेळी बांधणी करताना फक्त चांगली फांदी निवड करणे गरजेचे आहे.
यावेळी ते म्हणाले, की मूळ झाडाचे वय कलम केल्यानंतरच्या झाडाला प्राप्त होते. यावेळी त्यांनी वड, पिंपळ, उंबर ही झाडे मोठया प्रमाणात लावावी, असा सल्ला दिला. या कुळातील झाडांचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणतात, ही झाडे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे आहेत. यामुळे याचा फायदा पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात होतो. यासह ही झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात यश आले तर याचा फायदा म्हणजे वानरांचा त्रास कमी होण्यासाठी होऊ शकतो. ही वानरं या झाडांची फळे खाऊन जगतात. यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होऊ शकेल. पिकांचे होणारे नुकसान सुद्धा कमी होऊ शकेल.