वर्धा -जिल्ह्यातून तेलंगणा राज्यातील सिकंदराबादला उपचार घेत असलेले 63 वर्षीय वृद्ध हे कोरोनाबाधित असल्याचे उघडकीस आले आहे. त्या रुग्णाचा सिकंदराबाद येथे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 4 झाली आहे. तर, हे रुग्ण शहरातील असल्याने ते राहत असलेला परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. मात्र, या बातमीमुळे शहरात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
वर्धेच्या सुदामपुरी येथील रहिवासी असलेले 63 वर्षीय व्यक्ती हे यकृताच्याआजारावरील उपचारासाठी 17 मे रोजी तेलंगणा राज्यातील सिकंदराबादला गेले होते. तेथून सात दिवस उपचार घेऊन ते परत येणार होते. याकरता, दोन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये मंगळवारी प्राप्त चाचणी अहवालात सदर रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. परंतु, ते नेमके बाधित कुठे झाले हे अद्याप कळले नाही. सोबतच त्यांचे कुटुंबही या रुगणांला भेटून आले असल्याने परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. यामुळे वर्ध्याच्या सुदामपुरी परिसरातील 100 पेक्षा जास्त कुटुंब आता कंटेनमेंट झोनमध्ये सील करण्यात आली आहेत.
तर, सिकंदराबादमध्ये भरती असलेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील 17 व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात आयटीआय टेकडीवर ठेवण्यात आले. यामध्ये कुटुंबीय आणि त्यांचे निकटवर्तीय आहे.
वर्धा जिल्हा रुग्ण - 4(पैकी 1 मृत्यू)
वर्धा उपचार - 2
सिकंदराबाद उपचार - 1