वर्धा - खरीप हंगामात शेतकऱ्याला जगवणारे मुख्य पीक म्हणजे सोयाबीन आणि कपाशीकडे पाहिले जाते. पण यंदा सुरूवातीला पाऊस लांबल्याने आणि त्यानंतर सतत सुरू राहिलेल्या पावसाने कपाशीसोबतच सोयाबीनचे नुकसान झाले आहे. पावसाने उघडीप न दिल्याने पाणी शेतात साचून राहिले आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
कसे बसे सोयाबीन आले पण परतीच्या पावसाने तोंडचा घास हिसकावून घेत सोयाबीन मातीमोल झाले. कपाशीचीही स्थिती जेमतेमच आहे. अशा परिस्थितीत जगावे तरी कस, असा प्रश्न बळीराजा विचारत असताना आणेवारीत 'ऑल इज वेल' असल्याचे मांडले आहे. यावर हा खास रिपोर्ट पाहा ईटीव्ही भारतसोबत
सोयाबीन गेलं; आता कपाशीही जाण्याच्या मार्गावर, यंदा जगावं तरी कसं
कारंजा तालुक्यातील गवडी येथील शेतकरी घनश्याम बरांगे, यांनी सहा एकरात सोयाबीन सोबत कापूस पेरणी केली. पण शेतता पाणी साचून राहिल्याने सोयाबीनचे पीक सडले. अखेर त्रस्त होऊन त्यांनी रोटावेटर चालवला. शंभर टक्के नुकसान होऊन न खंचता रब्बीच्या तय्यारील लागले. पण सरकारने विचार करावा असे त्यांनी बोलून दाखवले.
वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील गवंडी येथील देवीदास घागरे. सुरूवातीला पाऊस लांबल्याने त्यांनी साडेतीन एकरात कपाशीची लागवड केली. पण, त्यानंतर सतत झालेल्या पावसाने कपाशीची वाढच झाली नाही. परिणामी प्रत्येक झाडाला केवळ चार ते पाच बोंड उगवले. त्यातही काही रोग आल्याने खराब होत आहे. अजून घरापर्यंत क्विंटलभर कापसू न आल्याने काय करावे असा प्रश्न विचारत आहे.
जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांचीही तीच अवस्था आहे. कुठे कुठे कपाशी झाडांची उंच वाढ झाली खरी पण, बोंडच आले नसल्याने केवळ पानाने बहरलेले झाड पाहता खर्च निघणेही कठीण आहे. आणेवारीत मात्र सरकारी यंत्रणेने सगळं चांगलं असल्याचे दाखवल्याने शेतकरी संतापले आहेत.
नुकत्याच जाहीर झालेल्या आणेवारीत 1 हजार 339 गावांची पैसेवारी 50 पैशांच्यावर दाखवली गेली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील शेताची परिस्थिती चांगली असल्याचे दाखवले गेले आहे. शेतकऱ्यांच्या घरात पीक पोहोचले नसताना, लागवड खर्च निघणे कठीण असताना पैसेवारी 50 वर दाखवल्याने शेतकरी मदतीपासून वंचीत राहणार आहे. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव घेत प्रशासनाला कळवणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. पण प्रशासनानेही परिस्थिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून समजून घेणे गरजेचे आहे.